सत्तेमध्ये सहभागी करून घेतले तरी अर्थ, महसूल, गृह, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा या महत्त्वाच्या सहा खात्यांपैकी एकही खाते शिवसेनेला न देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते. नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतही ही सर्व खाती भाजपकडे ठेवण्यावर एकमत झाले आहे.

फडणवीस यांनी गडकरी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे आणि खातेवाटप या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या विधीमंडळ गटाचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविणाऱया एकनाथ खडसे यांना गृहमंत्रीपद देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विदर्भातील आणखी एक नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. स्वतः गडकरी यांनीही खडसे आणि मुनगंटीवार यांना महत्त्वाचे मंत्रिपद देण्यात यावे, असे मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे अर्थखाते फडणवीस स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहितीही मिळाली आहे.
त्याचवेळी स्थिर सरकार बनविण्यासाठी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले तरी त्यांच्याकडे अर्थ, महसूल, गृह, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा यापैकी कोणतेही खाते देण्यात येणार नाही. शिवसेनेला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदे देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचे दिल्लीतील सूत्रांकडून कळते. फडणवीस गुरुवारी दिल्लीमध्ये भाजपच्या विविध नेत्यांची भेट घेणार असून, त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणार आहेत.