बाबरी मशिद पाडण्यासाठी वेळ पडल्यास डायनामाईट वापरण्याची शिवसेनेची योजना होती, अशी खळबळजनक माहिती कोब्रापोस्ट या वृत्तसंकेतस्थळाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली आहे. बाबरी मशिद पाडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना यांनी वेगवेगळ्या नावांनी संघटना स्थापन केल्या होत्या. आणि ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित होती, असाही गौप्यस्फोट कोब्रापोस्टने केला.
राम जन्मभूमी चळवळीमध्ये सक्रीय असलेल्या एकूण २३ महत्त्वाच्या व्यक्तींचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्याकडून बाबरी मशिद पाडण्याबद्दलची माहिती जमविण्यात आली. बाबरी मशिद पाडण्याची घटना उत्स्फूर्त नसून ती पूर्वनियोजित होती. त्याचबरोबर संघ परिवाराशी संबंधित विविध संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. संघाच्याच प्रशिक्षित स्वयंसेवकावर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
शिवसेनेने या कामात महत्त्वाची जबाबदारी बजावली होती. त्यासाठी पक्षाने प्रताप सेना नावाची संघटना स्थापन केली होती. या सेनेमध्ये सतीश प्रधान, आनंद दिघे यांच्यासह इतर स्वयंसेवक कार्यरत होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतः प्रताप सेनेच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती कोब्रापोस्टने दिली आहे.