भूमी अधिग्रहण विधेयकाला शिवसेनेचा सरसकट विरोध नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले. मात्र, या विधेयकातील काही तरतुदी शेतकऱयांच्याविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या विधेयकावरून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात असल्याचे चित्र दिसते आहे. शेतकऱयांच्या विरोधातील कोणत्याही कायद्याला शिवसेना समर्थन देणार नाही, असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
भाजपला घेरण्याची रणनीती
शिवसेनेच्या खासदारांची बैठक बुधवारी नवी दिल्लीमध्ये झाली. त्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना केंद्र सरकारविरोधात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे मतभेद नाहीत. मात्र, शेतकऱयांमुळे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाचा गळा घोटून चालणार नाही. शेतकऱयांनी आसूड ओढले तर सरकारला त्याचा त्रास होईल. भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्याच भूमिकेवर शिवसेना कायम राहणार आहे.