मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताला पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट करण्याची गरज होती. मी तसा सल्लाही त्यावेळच्या यूपीए सरकारला दिला होता. परंतु त्या सरकारने तो टाळला होता, असा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले शिवशंकर मेनन यांनी दिली. भारतावर झालेल्या हल्ल्यानंतर त्वरीत पाकव्याप्त काश्मीर आणि मुरीदके भागातील लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तळ आणि आयएसआयविरोधात कारवाई करण्याच्या बाजूने मी होतो, असेही त्यांनी सांगितले.
तीन दिवस चाललेली ही चकमक साऱ्या जगाने पाहिली होती. त्यामुळे भारतातील पोलीस आणि सुरक्षा दलांवर डाग लागला होता. मेनन यांनी ‘चॉइसेस: इनसाईड द मेकिंग ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाचे नुकतेच अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रकाशन करण्यात आले आहे.

पाकिस्तानवर त्याचवेळी हल्ला केला असता तर भारतापेक्षा पाकचाच फायदा अधिक झाला असता. त्यामुळेच भारताने हल्ला करणे टाळल्याचेही त्यांनी सांगितले. जर ज्याचवेळी हल्ला केला असता तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले असते. त्याचबरोबर त्यावेळी लोकशाही मार्गाने निवडून आलेले आसिफअली झरदारी सरकार संकटात आले असते. तसेच पाकव्याप्त काश्मीर आणि मुरीदके भागातील दहशतवादी तळ नष्ट केले असते तरी मोठा फरक पडला नसता असेही ते म्हणाले.

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ विदेशी व्यक्तींसमवेत सुमारे १६६ जण ठार झाले होते. लष्कर ए तोयबाने हा हल्ला केला होता.