दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलंद शहर येथे शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी एका कुटुंबाला लुटून माय-लेकीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर ६८ मध्ये रहाणार हे कुटुंब एक नातेवाईकाच्या तेराव्याच्या विधीसाठी शहाजहानपूर येथे चालले होते. कुटुंबात पती-पत्नी, दोन मुली आणि दोन इतर पुरुष मंडळींचा समावेश होता. त्यांची गाडी मध्यरात्री २.३० दरम्यान दोस्तपूर गावाजवळील एनएच ९१ या महामार्गावर थांबली असता झाडीमध्ये दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने गाडीवर लोखंडी सळई फेकून मारली. गाडीच्या चालकाने लगेच ब्रेक मारले व नक्की काय झाले ते पाहण्यासाठी तो खाली उतरला. हीच संधी साधून दरोडेखोर बाहेर आले व त्यांनी संपूर्ण कुटुंबाला बंदुकीच्या धाकावर बंधक बनवले. या टोळीने सुरवातीला मोटारीतील पुरुष व महिलांना महामार्गापासून काही अंतरावर नेत बांधून ठेवले. त्यानंतर दरोडेखोरांनी कुटुंबाजवळ असलेले दागिने आणि पैशांची लूट तर केली. पण त्याचसोबत कुटुंबातील ३५ वर्षीय महिला आणि तिच्या १४ वर्षाच्या मुलीवर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. शनिवारी सकाळी बांधून ठेवलेल्या नागरिकांनी स्वतःची सुटका करून घेत पोलिसांना याबद्दल माहिती दिली. उत्तरप्रदेश पोलिसांनी सहा पथके बनवून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
सात ते आठ अज्ञात व्यक्तिंवर दरोडा आणि सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच त्यांचा तपास घेण्यासाठी पोलिसांची तुकडी नेमण्यात आल्याचे पोलीस अधिका-याने सांगितले.