अमेरिकेतील मिसिसिपी येथे एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान ८ लोक ठार झाले आहेत. यामध्ये डेप्यूटी शेरीफचाही समावेश आहे. संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. मिसिसिपी येथील तपास यंत्रणेचे प्रवक्ते वॉरेन स्ट्रेन यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंकन काऊंटी येथील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये हा गोळीबार झाला. संशयिताविरोधात अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. हत्या करण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा तपास केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

हल्लेखोर पीडित व्यक्तींना ओळखत होता की नाही याबाबत अजून काही माहीत नसल्याचे स्ट्रेन यांनी म्हटले.

गत सोमवारी ब्रिटनमधील मँचेस्टर येथे अरियाना ग्रँडे या पॉप गायिकेच्या कार्यक्रमादरम्यान आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात २२ लोक ठार झाले होते. यामध्ये बहुतांश मुले व युवकांचा समावेश होता. आतापर्यंत याप्रकरणी १३ जणांची चौकशी केली असून त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतले आहे. या आत्मघातकी हल्ल्यामागे लिबियन वंशाच्या ब्रिटिश नागरिकाचा हात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.