एका चित्तथरारक घटनेत पूर्व दिल्लीतील कारकरडुमा न्यायालयात आज झालेल्या गोळीबारात एक पोलीस कॉन्स्टेबल ठार, तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चार युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गोळीबारात महानगर दंडाधिकारी सुनील गुप्ता थोडक्यात बचावले आहेत व एक गोळी त्यांच्या खुर्चीला चाटून भिंतीवर लागली, असे पोलिसांनी सांगितले.
मरण पावलेल्या कॉन्स्टेबलचे नाव राम कुमार असे असून तो दिल्ली पोलिसांच्या तिसऱ्या बटालियनमध्ये काम करीत होता. गुन्हेगारांची तुरूंगातून न्यायालयात ने-आण करण्याचे काम त्यांच्यावर होते. त्यांना चार गोळ्या लागल्या. दिल्ली सरकारने या कॉन्स्टेबलला १ कोटी रूपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींमध्ये कच्चे कैदी इरफान उर्फ छैनी पेहेलवान याचा समावेश आहे, त्याला न्यायालयात आणले होते. सकाळी अकरा वाजता ही घटना घडली असे पोलिसांनी सांगितले. इरफान व एका पोलिसाला दोन गोळ्या लागल्या आहेत त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे.कुमार यांना रूग्णालयात आणतानाच ते मरण पावले होते. हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यांनी गोळीबाराच्या दहा फैरी झाडल्या.या प्रकरणी चार युवकांना ताब्यात घेतले असून ते ईशान्य दिल्लीतील सीलामपूर व जवळपासच्या भागातील आहेत. ज्यांनी हल्ला केला होता त्यांच्या टोळीतील एकाला कैदी इरफानने आधी ठार मारले होते, त्याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आले. यातील एका सहआरोपीचा शोध चालू असून त्याने न्यायालयात गोळीबार सुरू असताना व्हिडीओ शुटिंग केले होते. हल्लखोर न्यायालयात कसे येऊ शकले याचाही पोलिस तपास करीत आहेत. हल्लेखोर त्या कैद्याला आणण्याची वाट पाहात होते व नंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण वकील व सुरक्षा जवानांनी त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.