उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांच्या आदेशावरून करण्यात येत असलेल्या क्षेपणास्त्र चाचणीच्या मालिकेचाच एक भाग म्हणून सोमवारी उत्तर कोरियाने लघू पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची समुद्रात प्रक्षेपण चाचणी केली.

उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत लघू पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली आहे. हे संयुक्त राष्ट्रे ठरावाचे उल्लंघन असून ते अस्वीकारार्ह आहे, असे संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने म्हटले आहे. उत्तर कोरियाने ६ जानेवारी रोजी पाचवी अणुचाचणी केल्यानंतर कोरिया द्वीपकल्पातील तणाव वाढलेला आहे. त्यानंतर लांब पल्ल्याच्या रॉकेटची चाचणी करण्यात आली असून त्याकडे क्षेपणास्त्र चाचणी म्हणून पाहिले जात आहे.संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने यापूर्वी उत्तर कोरियावर अत्यंत कडक र्निबध लादले. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी मोठय़ा प्रमाणावर लष्करी कवायती केल्या त्याकडे हल्ल्यांची रंगीत तालीम म्हणून पाहण्यात आले आणि त्यानंतर उत्तर कोरियाने सातत्याने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवर अणुहल्ल्यांची टांगती तलवार ठेवली आहे.