देशभर शोक; सियाचेन लष्करमुक्त करण्याची पाकची इच्छा
सियाचेनमधील तीन फेब्रुवारीच्या हिमवादळातही आश्चर्यकारकरित्या बचावलेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज गुरुवारी सकाळी पावणेबारा वाजता संपली. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने कर्नाटकातील त्यांचे जन्मगाव बेटादूरसकट सर्वच देश शोकदग्ध झाला. शुक्रवारी कर्नाटकातील त्यांच्या जन्मगावीच सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सियाचेन दोन्ही देशांनी लष्करमुक्त करणे हाच अशा दुर्घटनांवरचा एकमात्र उपाय आहे, अशी प्रतिक्रियावजा सूचना पाकिस्तानने केली आहे.
हणमंतप्पा यांच्यासह या हिमवादळात गाडले गेलेल्या अन्य नऊ जवानांचे मृतदेह आधीच बाहेर काढण्यात आले आहेत.
३३ वर्षे वयाचे हणमंतप्पा यांच्या पश्चात पत्नी महादेवी आणि नेत्रा ही दोन वर्षांची मुलगी आहे. ९ फेब्रुवारीला दिल्लीच्या ‘आर्मी रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटल’मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. बुधवारपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावून त्यांचे सर्व अवयव निकामी झाले होते.
दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्यासह सेनादलांच्या प्रमुखांनी तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी हुबळी येथील नेहरू मैदानात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर धारवाड जिल्ह्य़ातील कुंदगोळ तालुक्यातील बेटादूर गावी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

Untitled-10