पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी वेगवेगळी पक्षीय समीकरणे जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू या निवडणुकीत काय चमत्कार दाखवणार, ते कोणाच्या पाठिशी आपले पाठबळ उभे करणार, यावरही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सध्या उधाण आले आहे. सिद्धू यांनी आवाज ए पंजाब पक्षाची स्थापन केली असली, तरी त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे आम आदमी पक्षही प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू आणि काँग्रेस पक्ष यांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य करून सर्वांचेच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर अमरिंदर सिंग यांनी सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, नवज्योतसिंग सिद्धू अजून मला भेटलेले नाहीत. पक्षाच्या सरचिटणीसांनाही ते भेटलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्लॅन काय आहेत, ते आम्हाला माहिती नाही. पण काँग्रेस पक्षात त्यांचे कधीही स्वागतच केले जाईल. या संदर्भात पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे की, सिद्धू आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे. पण सध्या तरी राजकीय वर्तुळात ज्या काही चर्चा सुरू आहेत. त्याबद्दल स्पष्टपणे आम्हाला किंवा काँग्रेसमधील ज्येष्ठांना काहीही माहिती नाही.
नवज्योतसिंग सिद्धू यांना मी कधीही कामेडीयन म्हटलो नव्हतो, असे सांगून ते म्हणाले, एका मुलाखतीमध्ये मी सिद्धू हे कॉमेडी हे त्यांचे प्रोफेशन असल्याचे म्हटले होते. पण स्पष्टपणे त्यांना जोकर असे कधीच म्हटले नव्हते. पण मी हे ही सांगू इच्छितो की आम आदमी पक्षाचे भगवंत मान आणि गुरुप्रीत घुग्गी यांचा उल्लेख मी थेटपणे जोकर्स असाच केला होता. आणि ते खरोखर जोकरच आहेत. पण सिद्धूबद्दल मी असे कधीच म्हटलो नाही. त्यांचे प्रोफेशन कॉमेडी असल्याचे मी मुलाखतीत म्हटलो होतो. पण असे म्हणताना मला त्यांचा किंचितही अपमान करण्याचा हेतू नव्हता.