अमेरिकी अभिनेता व डिझायनर असलेल्या शीख व्यक्तीस फेटा असल्याने मेक्सिको सिटीहून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या विमानात बसण्यापासून रोखण्यात आले. वाॅरिस अहलुवालिया (वय ४१) असे या शीख व्यक्तीचे नाव असून ते मॅनहटनचे रहिवासी आहेत. मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते सकाळी साडेपाच वाजता विमानात बसण्यासाठी गेले असता एपोमेक्सिको एअरलाइनच्या खिडकीवर त्यांना पहिल्या वर्गाचे तिकीट देण्यात आले. त्याचा सांकेतांक एसएसएसएस होता, याचा अर्थ आपल्याला दुय्यम तपासणी पुरेशी आहे, असे त्यांना वाटले. पण नंतर त्यांना कडक सुरक्षा तपासणीस तोंड द्यावे लागले व फेटा असल्याने विमानात बसण्यापासून रोखण्यात आले. अहलुवालिया यांची ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ या ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटात भूमिका असून अमेरिकेतील ‘द कॅरी डायरीज’ या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी भूमिका केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की मी न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या विमानात बसू शकलो नाही कारण फेटा असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोखून धरले.
इन्स्टाग्रामवर त्यांनी निरुपयोगी ठरलेले तिकीट दाखवतानाचे छायाचित्र टाकले आहे. त्यांच्या पायांची, बॅगेची तपासणी करण्यात आली व नमुनेही घेण्यात आले.