पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका बस स्थानकावर मारामारीत शीख व्यक्तीच्या फेटय़ाची विटंबना करण्यात आली असून त्यात सहा जणांवर ईश्वरनिंदा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी महिंदर पाल सिंग या पंजाब प्रांतातील मुलतान जिल्ह्य़ात राहणाऱ्या व्यक्तीशी हाणामारी केल्याच्या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे. महिंदर पाल सिंग हा फैसलाबाद येथून मुल्तानला जात असताना कोहिस्तान-फैजल मूव्हर्स कंपनीच्या बसमध्ये दिजकोट येथे बिघाड झाला. तो चालकाने दुरूस्त केला तरी बस चिचावटणी स्थानकापर्यंत पोहचण्यास पाच तास लागले. तेथे सिंग व सह प्रवाशांनी वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे गाडीच्या कमी वेगाबाबत तक्रार केली व पर्यायी वाहन मुल्तानला जाण्यासाठी द्यावे अशी मागणी केली. त्यात कंपनी कर्मचारी व प्रवासी यांच्यात वादावादी झाली. तेथे बस स्थानकावरील फेरीवाला रशीद गुज्जर याने महिंदर पाल सिंग याला मारहाण करून त्याचा फेटा पायदळी तुडवला. फेटा हा शीखांसाठी पवित्र मानला जातो, तो फेकणे ही विटंबना आहे असे सिंग याचे म्हणणे आहे. बस स्थानक व्यवस्थापक बकीर अली, गुज्जर, फैज आलम, हाजी रियासत, शकील व सनावल यांच्या विरोधात कलम २९५ (ईश्वरनिंदा), कलम ५०६ ( धमक्या देणे), कलम १४८ अन्वये गुन्हे दाखल केले असल्याचे व अटकेसाठी छापे टाकल्याचे चिंचवटनीचे पोलिस प्रमुख खैजर हयात यांनी सांगितले