ऑस्ट्रेलियात एका पाच वर्षांच्या शीख मुलाला पगडी घातल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. डोक्यावर पगडी घालणे हे शाळेतील गणवेशाच्या धोरणाला धरून नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. त्यामुळे २००८ मध्ये खासगी संस्थांतील अशाप्रकारांसंदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे उल्लंघन झाले आहे. या सर्व प्रकारासंबंधी मुलाच्या पालकांनी एसबीएस टीव्हीशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. मेलबर्नच्या मेल्टन ख्रिस्तियन महाविद्यालायत (एमसीसी) प्रवेश घेण्यासाठी माझ्या मुलाला धार्मिक प्रथेचा त्याग करावा लागला, हे खूप निराशाजनक आहे, असे सागरदीप सिंग अरोरा यांनी म्हटले. आम्ही यासंबंधी मानवी हक्क समितीकडे तक्रार दाखल केली आहे. शाळेची ओळख आणि एकात्मता टिकविण्यासाठी सामाईक गणवेशाची निकड मला समजू शकते. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्माची महत्त्वपूर्ण  प्रतिके परिधान करण्यास किंवा वस्तू बाळगण्यास परवानगी दिली पाहिजे. शाळांकडून विद्यार्थ्यांचा हा हक्क नाकारला जाणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असे अरोरा यांनी म्हटले.ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये आपण शीख धर्मातील केसांचे व पगडीचे महत्त्व आणि विविध संघटनांमध्ये पगडीला गणवेश म्हणून मान्यता देण्याविषयी चर्चा करत असतो. मात्र, तरीही महाविद्यालयांकडून त्यांच्या धोरणात बदल केला जात नाही. ही गोष्ट निराशाजनक असून अशाप्रकारच्या अनेक समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागते, असे अरोरा यांनी सांगितले.
दरम्यान, अरोरा यांच्या तक्रारीनंतर मेल्टन ख्रिस्तियन महाविद्यालायाने (एमसीसी) मानवधिकार आयोगाकडे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये आम्ही शाळेच्या गणवेशाशिवाय कोणत्याही अतिरिक्त वस्तूंना परवानगी देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. आमच्या महाविद्यालयाचा गेल्या ३० वर्षांचा इतिहास धार्मिक सहिष्णुतेचा आहे. गेल्या तीस वर्षांपासून आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि अन्य विकास उत्तमप्रकारे होत असून ते त्यांच्या धार्मिक मान्यतांनाही न्याय देत आहेत. आम्हाला या सर्वसमावेशकपणाचा अभिमान आहे. सागरदीप सिंग यांच्या समस्येची आम्ही सन्मानपूर्वक दखल घेतली आहे. मात्र, आमच्या धोरणामुळे आम्ही गणवेशाव्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त गोष्टीला परवानगी देऊ शकत नसल्याचे एमसीसीने म्हटले आहे.