इंदूर जिल्हा न्यायालयाने बंदी असलेल्या सिमी संघटनेचा मास्टरमाइंड सफदर हुसेन नागोरी समवेत ११ आरोपींना देशद्रोहप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने वर्ष २००८ मधील एका प्रकरणात हा निर्णय दिला.
गतवर्षी येथील एका विशेष न्यायालयाने निर्णयासाठी २७ फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने अहमदाबाद येथील साबरमती केंद्रीय तुरूंगात बंद असलेल्या १० आरोपींच्या मागणीनंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा निर्णय दिला.

सरकारी वकील विमल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष अप्पर सत्र न्यायाधीश बी. के. पालोदांनी ही शिक्षा सुनावली. त्यांनीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर येण्याची मुभा दिली होती.
यापूर्वी नागौरीशिवाय आमिल परवेज, शिबली, कमरूद्दीन, हाफिज, शाहदुली, कामरान, अन्सार, अहमद बेग आणि यासिन यांनी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. या सर्वांवर प्रक्षोभक भाषण करणे, देश विरोधी साहित्य जवळ बाळगणे आणि ट्रेनिंग कॅम्प चालवण्याचा आरोप आहे. २००८ मध्ये अटकेनंतर त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात हत्यारे आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला होता.