माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीची चौकशी विशेष चौकशी पथकाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
  दिल्ली निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना खूश करण्यासाठी भाजप सरकारने असा निर्णय घेतला असावा, अशी टीका काँग्रेसने केली आहे. केंद्र सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी करावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जी.पी.माथूर यांच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबरला एक समिती नेमली होती, या समितीने पथक नेमण्याची शिफारस करणारा अहवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शीखविरोधी दंगलीबाबत विशेष चौकशी पथक नेमण्याची शिफारस करण्यात आली असून दिल्ली विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर ही घोषणा केली जाईल. कारण आचारसंहिता लागू असताना अशी घोषणा करता येणार नाही.
शीखविरोधी दंगलीत ३३२५ लोक मारले गेले होते, त्यात दिल्लीत २७३३ व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व इतर राज्यात उर्वरित लोक मारले गेले होते. दिल्ली निवडणुकीत मते मिळावीत यासाठी ही चाल भाजपने खेळली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही चाल खेळण्याचे ठरवले आहे जर तसे असेल तर खेदजनक आहे.
अकाली दल नेते व दिल्ली शीख गुरुद्वारा समितीचे प्रमुख मनजित सिंग यांनी शीखविरोधी दंगलीची विशेष चौकशी पथकामार्फत फेरचौकशी करण्याच्या संभाव्य निर्णयाचे स्वागत केले आहे. मनजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते, तेव्हा त्यांनी दंगलपीडित शिखांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.