मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची निवड झाली. माकपचे एकविसावे अधिवेशन येथे झाले त्यात मध्यवर्ती समितीचे ९१ सदस्य व पॉलिटब्युरोचे १६ सदस्य निवडण्यात आले.
अधिवेशन म्हणजे भविष्य आहे व पक्षाचे व देशाचे भवितव्य आहे असे येचुरी यांनी सांगितले. आपले काम डाव्या व लोकशाही व्यक्तींची एकजूट हे आहे. जगात सगळीकडे भांडवलवाद पेचात सापडला आहे. त्यामुळे समाजवादाचा लढा हा बळकट करण्यावाचून दुसरा पर्याय नाही, मानवी संस्कृतीला जर भवितव्य असेलच, तर ते समाजवादात दडलेले आहे. येचुरी यांचे नाव मावळते सरचिटणीस प्रकाश कारत यांनी सुचवले व एस. रामचंद्रन पिल्ले यांनी त्याला अनुमोदन दिले. सरचिटणीसपदासीठी येचुरी यांचे नाव आघाडीवर होते. पिल्ले यांनी ते सरचिटणीसपदाच्या शर्यतीत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.  
नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध धोरणात्मक लढाई व हिंदुत्ववादी शक्तींच्या जातीयवादी कार्यक्रमांना विरोध हे प्रमुख काम पक्षापुढे आहे, पण त्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली जाणार नाही असे पक्षाने स्पष्ट केले.