सियाचीन ग्लेशियरमधील हिमस्खलनात आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या लान्स नायक हणमंत अाप्पा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हणमंत अाप्पा यांच्यावर सध्या दिल्लीतील आर आर रूग्णालयात उपचार सुरू असून रूग्णालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या वैद्यकीय बातमीपत्रात त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती देण्यात आली. हणमंत आप्पा अजूनही बेशुद्ध असून त्यांचा रक्तदाब खालावलेला आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून पुढील २४ ते २८ तास त्यांच्या प्रकृतीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

सियाचीन ग्लेशियरमध्ये ३ फेब्रुवारीला हिमस्खलनामुळे १९ मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून संयुक्तपणे शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर सोमवारी रात्री मदत कार्याला यश आले. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल २५ फूट बर्फ कापून काढल्यानंतर हणमंत आप्पा यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यांना सुरूवातीला सियाचीन ग्लेशियर येथील लष्कराच्या बेस कॅम्पमध्ये आणि त्यानंतर एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील आर आर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हणमंत अप्पांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

या भागामध्ये हिमस्खलनाच्या घटना सातत्याने घडत असतात. गेल्याच महिन्यात हिमस्खलन झाल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता. समुद्रसपाटीपासून १९६०० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते. अत्यंत विषम नैसर्गिक परिस्थितीत जवान या ठिकाणी कार्यरत असतात. हिवाळ्यामध्ये येथील किमान तापमान उणे ६० अंश सेल्सियसपर्यंत खाली येते.