सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापाती सुरुच असून मंगळवारी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराचा सीमारेषेवरील निवासी भागाला फटका बसला. या गोळीबारात सात जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सीमा रेषेवरील आरएस पुरा आणि नौशेरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘आज सकाळी १० पासून पाकिस्तानी सैन्याने नौशेरा येथे भारतीय चौक्यांवर मोर्टार बॉ़म्ब डागले. तसेच गोळीबारही केला ‘अशी माहिती भारतीय सैन्याच्या अधिका-यांनी दिली. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराचा आरएस पुरामधील एका गावाला फटका बसला. मॉर्टर बॉम्बमुळे गावातील सात महिला जखमी झाल्या आहेत. या महिलांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी झालेले सर्व जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.

गेल्या ४८ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. तर भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सात जवानांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने सीमा रेषेवरील गावात राहणा-या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमच्याकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. आता गावात राहायची भीती वाटते. पण गाव सोडून अन्यत्र जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली आहे.