पाकिस्तानच्या लाहोर शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ मंगळवारी एका दहशतवाद्याने केलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात दोन पोलिसांसह सहा जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला पोलीस आणि दहा वर्षांच्या मुलाचा समावेश असून त्यांच्यासह पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जवळच्या मायो आणि सर गंगाराम रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
तेहेरिक-ए-तालिबान-पाकिस्तान या संघटनेतील जमात-उल-अहरार या फुटीर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पेशावर येथील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती उठवून तुरुंगात डांबलेल्या अनेक दहशतवाद्यांना फाशी दिली. त्याचा बदला म्हणून आपण हा स्फोट घडवल्याचे जमात-उल-अहरारचा प्रवक्ता अहसानउल्ला अहसान याने सांगितले. लाहोरमध्ये किला गुज्जर सिंग या भागात पोलीस मुख्यालय आहे. त्याच्या आजूबाजूला लाहोर प्रेस क्लब, पीटीव्ही, रेडिओ पाकिस्तान यांसारखी सरकारी प्रसारमाध्यमांची कार्यालये, रेल्वे मुख्यालय, शाळा आणि खासगी विमानसेवांची कार्यालये आहेत.