सरकारी कार्यालयांवर हल्ला करण्याची योजना आखत असलेले तालिबानचे सहा दहशतवादी सुरक्षा रक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झाले.
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेतून फुटलेल्या उस्ताद अस्लम गटाचे १० संशयित दहशतवादी काटची अबादी परिसरातील तलत पार्क येथे आल्याची खबर गुप्तचर यंत्रणांनी बुधवारी दिली.
शहरातील सरकारी कार्यालये आणि मान्यवर व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना हे दहशतवादी आखत होते, असे पोलिसांनी सांगितले. पंजाब पोलिसांच्या पथकाने सदर परिसराला वेढा घातला असता संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये सहा दहशतवादी ठार झाले.
या चकमकीनंतर चार दहशतवादी पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे, स्फोटके, डिटोनेटर्स, दोन रायफली, तीन दुचाकी, चार पिस्तुले असा साठा हस्तगत केला. पसार झालेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

गिरिदीहमध्ये माओवाद्यांचे दोन बंकर उद्ध्वस्त
गिरिदीह (झारखंड) : पारसनाथ डोंगराळ भागाच्या पायथ्याशी सुरक्षा रक्षक आणि बंडखोरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चकमक सुरू असून गुरुवारी माओवाद्यांचे दोन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले.माओवाद्यांचे दोन बंकर उद्ध्वस्त करून सुरक्षा रक्षकांनी शस्त्रांचा साठा हस्तगत केला. माओवाद्यांनी बुधवारी काही स्फोट घडवून गोळीबार केला, त्याला सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, असे पोलीस अधीक्षक अखिलेश वेरियर यांनी सांगितले.