सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात
भारताने आज पन्नासावे यशस्वी उड्डाण साजरे करताना सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) ही मोठी कामगिरी असून त्यातून आपल्या देशाला परकीय चलनही प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. सिंगापूरचे हे उपग्रह त्या देशात आपत्ती निरीक्षण व शहर नियोजनासाठी वापरले जाणार आहेत.
इस्रोने या वर्षी व्यावसायिक उड्डाणांची हॅटट्रिक केली असून जुलै व सप्टेंबरमध्ये अमेरिका व ब्रिटनसह काही देशांचे एकूण ११ उपग्रह सोडण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसएलव्ही सी २९ प्रक्षेपकाने हे उपग्रह ५५० कि.मी.च्या कक्षेत नेऊन सोडले. सायंकाळी सहा वाजता हे उड्डाण झाले व त्यानंतर २१ मिनिटांत हे उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी उड्डाणाचे स्वागत केले आहे.
२०१६ मध्ये आम्ही संदेशवहन व निरीक्षण उपग्रह सोडणार आहेत व आणखी चांगली कामगिरी करून दाखवू, असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले.