‘एनसीईआरटी’ पाठय़पुस्तकांबाबत दिनानाथ बात्रा यांच्या संस्थेच्या अजब शिफारसी

अभ्यासक्रमातील इंग्रजी, उर्दू, अरबी शब्द काढून टाका.. मिर्झा गालीबच्या रचना वगळा.. रविंद्रनाथ टागोर यांच्या विचारावंर फुली मारा.. भारतीय जनता पक्ष हा हिंदू पक्ष असा उल्लेख वजा करा.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित दिनानाथ बात्रा यांच्या अध्यक्षतेखालील ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’ या संस्थेने पाठय़पुस्तकांबाबत अशा अनेक शिफारसी ‘एनसीईआरटी’ला केल्या आहेत!

देशातील पाठय़पुस्तकांच्या घडणीबाबत एनसीईआरटीने जनतेकडून मध्यंतरी सूचना, शिफारसी मागविल्या होत्या. त्यावर बात्रा यांच्या संस्थेने वरील शिफारसी केल्या आहेत. ‘एनसीईआरटीच्या सध्याच्या पाठय़पुस्तकांमध्ये अनेक निर्थक व पक्षपाती गोष्टी आहेत. काही विशिष्ट समूहांचे तुष्टीकरण करण्यात आले आहे. दंगलींचा इतिहास शिकवून तुम्ही मुलांमध्ये काय प्रेरणा निर्माण करणार? अशा गोष्टींना आक्षेप घेणाऱ्या आमच्या सूचना एनसीईआरटीला पाठविण्यात आल्या आहेत’, असे या न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांनी नमूद केले.

‘नॅशनल कॉन्फरन्स हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असा उल्लेख पाठय़पुस्तकात असून तो वगळण्यात यावा’, असे न्यासाचे म्हणणे आहे.

सन २००२ मध्ये गोध्रा येथे रेल्वेगाडीला ‘आग लागली’ असा उल्लेख एका पुस्तकात आहे, तो बदलून ‘आग लावण्यात आली’, असा करावा, अशीही शिफारस न्यासाची आहे.