केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आणखी तेरा शहरांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यात निवडणुका होणार असलेल्या उत्तर प्रदेशातील लखनौ, तेलंगणातील वारंगळ, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला या शहरांचा समावेश आहे.

काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील २३ शहरांना पहिल्या फेरीतील सादरीकरणाच्या स्पर्धेत स्थान मिळाले नव्हते, त्यांनी जलद सादरीकरणाच्या स्पर्धेत भाग घेतला. त्यात तेरा शहरांना स्थान मिळाले आहे, असे नागरी विकासमंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. नवीन स्पर्धेत २३ शहरांपैकी १३ शहरे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पात्र ठरली आहेत. नव्याने पात्र ठरलेल्या शहरात चंडीगड, रायपूर (छत्तीसगड), न्यू टाऊन कोलकाता, भागलपूर (बिहार), पणजी (गोवा) पोर्ट ब्लेअर (अंदमान व निकोबार), इम्फाळ (मणिपूर), रांची (झारखंड), आगरतळा (त्रिपुरा), फरिदाबाद (हरयाणा) यांचा समावेश आहे. तेरा शहरांची निवड झटपट स्पर्धेत करण्यात आली असून एकूण गुंतवणूक ३०,२२९ कोटींची आहे. एकूण ३३ शहरांत (जानेवारीतील २० व आताची १३) ८०,७८९ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे असे नायडू यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. पाटणा (बिहार), सिमला (हिमाचल प्रदेश), नया रायपूर (छत्तीसगड), इटानगर (अरुणाचल प्रदेश), अमरावती (आंध्र प्रदेश), बेंगळुरू (कर्नाटक), तिरूअनंतपुरम (केरळ) यांचा स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या १०० शहरांत समावेश नव्हता. त्यांना इतर शहरांसमवेत स्पर्धेच्या पुढील टप्प्यात सहभागाची संधी मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली व मीरत तसेच जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर यांची निवड नंतर मूल्यमापनासाठी केली जाईल असे त्यांनी सांगितले.