इंग्लंडमधील संशोधन
स्मार्ट ग्लासच्या मदतीने स्मार्टफोनला सारखे चार्जिग करावे लागणार नाही अशी व्यवस्था करता येणार आहे याबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न कंपनी असलेल्या बोडल टेक्नॉलॉजीज या कंपनीने एक नवीन स्पर्श पदार्थ तयार केला असून या संशोधनात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा समावेश आहे.
फेरवापराच्या (रिरायटेबल) डीव्हीडीमध्ये जे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचाच वापर यात केला जातो, यात जो पदार्थ वापरला आहे त्यातून उच्च तंत्रज्ञान पडदे (डिस्प्ले) तयार करता येतात व त्यात सूक्ष्म विद्युत लहरी वापरलेल्या असतात. त्यामुळे या पदार्थापासून बनवलेली स्मार्ट काच ही विद्युत पुरवठय़ाशिवाय सूर्यप्रकाशातही पडद्याचे काम करते. स्मार्टफोनमध्ये निम्मी ऊर्जा ही त्याचा पडदा प्रकाशित ठेवण्यात खर्च होत असते त्यामुळे मोबाईलची बॅटरी कमीवेळा चार्ज करावी लागेल त्यामुळे ९० टक्के बॅटरी वाचेल. स्मार्टफोन व अंगावर बाळगण्याच्या यंत्रांपेक्षा (स्मार्ट वॉच व इतर) हा शोध खूप महत्त्वाचा आहे. त्यातून अशा स्मार्टफोनना मोठी बाजारपेठ मिळू शकते. स्मार्टवॉचेस रोज रात्री चार्ज करावी लागते. त्यामुळे त्यांच्या खपावर परिणाम होतो आहे पण स्मार्ट वॉचमध्ये स्मार्ट ग्लासचा वापर केला तर ते जास्त योग्य ठरेल असे बोडल टेक्नॉलॉजीजचे पेमन होसेनी यांनी सांगितले. स्थिती बदलणाऱ्या पदार्थाचा काही नॅनोमीटर जाडीचा पापुद्रा घेऊन त्यांचे सँडवीच सारखे दोन थर बनवतात ते दोन्ही पारदर्शक इलेक्ट्रोड असतात व त्या सँडविचसारख्या रचनेला स्टॅक असे म्हणतात. त्यामुळे कमी प्रमाणात विद्युत प्रवाह तयार होतो. स्टॅक्सचा वापर हा रंगबिदूसारखा होतो व त्यात ३०० बाय ३०० नॅनोमीटर आकारात नॅनो रंगबिंदू तयार होतात व त्यात विद्युतपुरवठा चालू बंद होतो, रंगबिंदू हे उच्च विवर्तनाचे असतात. त्यामुळे प्रकाशाचा वापर करून किफायतशीर दरात फोन तयार करता येतील, शिवाय त्यातील बॅटरी सारखी चार्जही (विद्युतभारित) करावी लागणार नाही असे ऑक्सफर्डचे प्राध्यापक व बोडल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक संचालक हरीश भास्करन यांनी सांगितले.