कर्करोगाचे स्वस्तात निदान करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करता येतो तसे तंत्रज्ञान अमेरिकी संशोधकांनी विकसित केले आहे. डी ३ हे या मोबाईल निदान तंत्रज्ञानाचे नाव असून वैद्यकीय तज्ज्ञ त्याचा वापर दूरस्थ भागातील व्यक्तींच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी करतात. आतापर्यंत तरी त्याचे निदान अचूक आले आहे. कर्करोग निदानाच्या मोबाईल चाचणीला केवळ १.८० डॉलर इतका खर्च येतो.
नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल कॅन्सर सेंटर अँड सेंटर फॉर सिस्टीम बायॉलॉजी या संस्थेतील डॉक्टर सीझर कॅस्ट्रो यांनी सांगितले की, अतिशय कमी किमतीत कर्करोगाचे निदान करणारे साधन आम्ही शोधून काढले आहे.
डी ३ याचा अर्थ डिजिटल डिफ्रॅक्शन या तंत्राच्या मदतीने हे निदान केले जाते. बॅटरीच्या मदतीने एलईडी लाइट यात स्मार्ट फोनला लावलेला असतो व तो कॅमेऱ्याने टिपलेल्या उच्च विवर्तन प्रतिमा बघतो. नेहमीच्या सूक्ष्मदर्शित्रापेक्षा जास्त भाग यात पाहायला मिळतो.  
डी ३ प्रणाली एका प्रतिमेत रक्तातील किंवा उतींच्या नमुन्यातील १ लाख पेशींचा वेध एकावेळी घेऊ शकते. या पद्धतीत रक्ताच्या नमुन्यात अगदी सूक्ष्म मणी टाकले जातात. ते मणी कर्करोगाच्या रेणूंना चिकटतात नंतर तो नमुना डी ३ प्रतिमाकरणासाठी वापरला जातो. यातील माहिती सांकेतिक पद्धतीने क्लाऊड डिव्हाइसवर पाठवली जाते व सव्‍‌र्हरने त्या माहितीवर संस्करण केले जाते.
विशिष्ट रेणूंच्या माध्यमातून कर्करोग आहे की नाही हे समजते व त्यासाठी डिफ्रॅक्शन तंत्राचा वापर केला जातो. हे डिफ्रॅक्शन सूक्ष्ममण्यांमुळे तयार होते. त्या चाचणीचे निदान डॉक्टरांना काही मिनिटातच पाठवले जाते. कर्करोगाच्या निदानासाठी काही दिवस, आठवडे लागत नाहीत. यातील चाचणी गर्भाशय मुखाच्या कर्करोगातील २५ स्त्रियांचे नमुने घेऊन करण्यात आली. त्यांची पॅप स्मिअर ही नेहमीची चाचणी करण्यात आली होती. तितक्याच अचूकतेने नवीन डी ३ पद्धतीने चाचणी करण्यात आली. काही रुग्णांची लसिकापेशींची चाचणी करण्यात आली, त्यात अचूक निदान करणे शक्य झाले. आणखी जास्त प्रकारच्या कर्करोगांचे निदान करण्यासाठी या यंत्रणेचा वापर शोधून काढणे आवश्यक आहे.
 एमडीएच सेंटरचे संशोधक राल्फ वेसलेडर यांच्या मते या उपकरणाने कर्करोग निदानातील अनेक अडथळे दूर होतील व दूरस्थ लोकांचे निदान करणे शक्य होईल. मोबाईल फोन तंत्रज्ञान आता सगळीकडे पोहोचले आहे त्यामुळे जगात आत कर्करोगाचे निदान सोपे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निदानाला विलंब झाल्याने अनेकदा रुग्णांची अवस्था वाईट होते ती यामुळे टळणार आहे.