केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांच्यातील वादावरून सध्या ट्विटरवर मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. अशोक चौधरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्मृती इराणी यांना ‘डिअर’ म्हणून संबोधल्याने या सगळ्याला सुरूवात झाली. चौधरी यांनी सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांसदर्भात भाष्य करताना हे ट्विट केले होते. डिअर स्मृती इराणीजी, राजकारण आणि भाषणातून कधी वेळ मिळाला तर शिक्षण धोरणाकडे लक्ष द्या, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटने स्मृती इराणी इतक्या व्यथित झाल्या की, त्यांनी लगेचच चौधरी यांना प्रत्युत्तर दिले. अशोक चौधरी तुम्ही महिलांना ‘डिअर’ म्हणून कधीपासून संबोधित करायला लागलात, असा सवाल इराणी यांनी विचारला.


दरम्यान, इराणी यांच्या या ट्विटचा ट्विटरकरांनी चांगलाच समाचार घेतला. एखाद्याला ‘डिअर’ म्हणून संबोधण्यात काय चुकीचे आहे?, व्यवहारात एकमेकांशी बोलताना अशाप्रकारेच सौजन्य दाखविले जाते. त्याला वेगळे वळण देण्याची काय गरज होती, अशा धाटणीचे अनेक सवाल इराणी यांना विचारण्यात येत आहेत.