पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी, तुम्हाला हे सांगण्यासाठी ४२ वर्षे लागली. हिटलरपासून कुणी प्रेरणा घेतली हे सांगण्याची गरज नाही. आणीबाणी कुणी लादली आणि लोकशाहीची गळचेपी कुणी केली हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, असं उत्तर इराणी यांनी राहुल गांधींना दिलं.

राहुल यांनी शुक्रवारी (२१ जुलै) ट्विट करत केंद्र सरकारवर नाझी राजवटीसारखा ‘वास्तवतेत गडबड’ केल्याचा आरोप केला. मोदी सरकार हे हुकूमशहाचा सरकार असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी त्यांनी हिटलरचं उदाहरण दिलं. वास्तविकतेवर चांगली पकड ठेवा कारण तुम्हाला हवं तेव्हा त्यात बदल करता येईल, असं हिटलर म्हणाला होता. देशात सध्या अशीच परिस्थिती आहे. केंद्र सरकार गरिबांवर अत्याचार करत आहे, अशी टीका राहुल यांनी ट्विटद्वारे केली. राहुल यांच्या या टीकेला स्मृती इराणींनी उत्तर दिलं आहे. या विषयावर बोलायला राहुल गांधींना ४२ वर्षे लागली असं उपरोधिकपणं सांगून हिटलरपासून कोण प्रेरित आहे हे सांगण्याची गरज नाही. आणीबाणी कुणी लादली आणि लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम कुणी केलं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, असं इराणी म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणावरही ट्विटमधून भाष्य केलं. वेमुलानं आत्महत्या केली, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी त्याची हत्या झाली असं सांगितलं आहे. ही हत्या वाईट वागणुकीविरोधात सामना केल्यानं झाली. त्यामुळंच त्याची हत्या करण्यात आली. तो दलित असल्यानंच त्याची हत्या करण्यात आली, असा आरोपही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. भाजप खोटं लपवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांचं आवाज दाबण्याचा प्रयत्न या देशात होत आहे. गरीब आणि कमजोर लोकांची गळचेपी केली जाते. नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत. त्यांचे सहकारीही त्यांच्याविरोधात बोलण्यास घाबरतात, अशी टीकाही राहुल यांनी केली. मोदी काय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत कुणीच दाखवत नाही. आता वास्तवतेचा गळा घोटला जातोय, असा आरोपही त्यांनी केला. राहुल यांच्या टीकेवर इराणी यांनी लगेच उत्तर दिलं. काँग्रेस पक्षाचा इतिहास जाणून घेण्याचा सल्ला त्यांनी राहुल यांना दिला. काँग्रेसचं भविष्य धूसर आहे, आपल्या देशाचा नाही, असंही त्या म्हणाल्या.