केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद सुरुच आहे. त्याचदरम्यान यासंबंधी आणखी एक माहिती उजेडात आली आहे. स्मृती इराणी यांनी शैक्षणिक पात्रतेसंबंधी माहिती उघड करू नये, असे दिल्ली विद्यापीठाला सांगितले होते, अशी माहिती स्कूल ऑफ ओपन लर्निंगने (एसओएल) केंद्रीय माहिती आयोगाला दिली आहे. त्यामुळे इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी सर्व माहिती त्यांच्या समक्ष सादर करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने स्कूल ऑफ ओपन लर्निंग (एसओएल)ला दिले आहेत. माहिती आयोगाकडे इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी माहिती सादर करण्यात अपयशी ठरल्याने दिल्ली विद्यापीठाच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. स्मृती इराणी यांनी २००४, २०११ आणि २०१४ मध्ये निवडणूक लढविण्याआधी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी चुकीची माहिती दिली होती, असा आरोप एका याचिकाकर्त्याने केला होता. त्यानंतर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद सुरू झाला. एप्रिल २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी इराणी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण १९९६ मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतल्याचा उल्लेख केला होता. तर ११ जुलै २०११ मध्ये गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढताना त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता बी. कॉम (भाग १) अशी नमूद केली होती.

दरम्यान, यासंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात खूप उशीर झाल्याचे कारण देण्यात आले होते. मात्र, केंद्रीय माहिती आयोगाकडे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयीचा वाद अद्याप सुरूच आहे. इराणींच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधीची माहिती एसओएलकडून मिळाली नसल्याचे कारण देत याचिकाकर्त्याने याचिका दाखल केली आहे. माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर इराणी यांच्या विनंतीनुसार, त्यांची शैक्षणिक पात्रता जाहीर न करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथूर यांनी इराणी यांची बी.एची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते.