भारतातलल्या ई-काॅमर्स क्षेत्रातली स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट अशा बड्या कंपन्यांना तोंड देताना  या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘स्नॅपडील’नेही कंबर कसली आहे. पण यासाठी त्यांनी ‘काॅस्ट कटिंग’चा मार्ग अवलंबला असून या कंपनीमधून ५०० ते ६०० जणांना नोकरीवरून काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोकरीमधली ही कपात फक्त ज्युनिअर लेव्हलवर न होता मिड आणि सीनियर लेव्हलवरही होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. ‘स्नॅपडील’,’व्हल्कन’ आणि ‘फ्रीचार्ज’ अशा तीन कंपन्यांमधून ही नोकरकपात होणार आहे. ‘व्हल्कन’ आणि ‘फ्रीचार्ज’ याच समूहातल्या कंपन्या आहेत.

भारतातल्या ई-काॅमर्स मार्केटमध्ये सुरूवातीला ‘फ्लिपकार्ट’ चं अधिराज्य होतं पण अलीकडे अॅमेझाॅनने फ्लिपकार्टला चांगली टक्कर देत भारतात आपले पाय रोवायला सुरूवात केली आहे. या स्पर्धेमध्ये स्नॅपडीलसारख्या कंपन्याही असल्या तरी अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टच्या तुलनेत स्नॅपडील काहीशी मागे पडत असल्याचं चित्र होतं. आपल्या यापुढच्या बिझनेस प्लॅनसाठी नवीन कर्ज मिळवणंही स्नॅपडीलसाठी कठीण जात होतं. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी आता नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय स्नॅपडीलने घेतला आहे. स्नॅपडीलच्या प्रवक्त्यानेही अप्रत्यक्ष स्वरूपात या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“भारतातली पहिल्या क्रमांकाची ई-काॅमर्स कंपनी होण्यासाठी आम्ही आमची कंपनी किफायतशीर करणार आहोत.यामुळे आम्हाला आमचे कर्मचारी आणि ग्राहक या सगळ्यांना योग्य न्याय देणं शक्य होईल” असं स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने सांगितलं.

सध्या स्नॅपडीलमध्ये ८००० कर्मचारी काम करत आहेत. यातल्या ५०० ते ६०० जणांना नोकरीवरून काढण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अॅमेझाॅन ही जागतिक कंपनी आहे. त्यामुळे इतर मार्केट्समधला नफा भारतीय बाजारपेठेत वळवून इथे काही काळ तोटा सहन करत पाय रोवणं अॅमेझाॅन ला शक्य आहे. भारतीय बाजारपेठेतल्या आपल्या आधीच्या प्रबळ स्थिथीचा फायदा घेत फ्लिपकार्टला सध्या या स्पर्धेत टिकून राहणं शक्य होतंय. पण स्नॅपडीलसारख्या तुलनेने लहान कंपनीला नोकऱ्यांमधली कपात करत बाजारपेठेत आपण टिकून राहणार असण्याचा संदेश देणं आवश्यक आहे. नवीन भांडवल उभारत स्पर्धेत टिकून राहणं यामुळे स्नॅपडीलला शक्य होणार आहे. पण त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवरती संक्रांत येण्याची चिन्हं आहेत.