भारताच्या स्टार्टअप क्षेत्रामध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे. सध्या काही मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात पाहायला मिळत आहे तर त्यांच्या तुलनेनी लहान असणारे स्टार्टअप त्या कर्मचाऱ्यांना सामावून घेत असल्याचे दिसत आहे.  नुकताच स्नॅपडील या कंपनीने ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.  या कर्मचाऱ्यांना मोबिक्विक आणि पेटीएम या कंपन्यांनी सहारा दिला आहे. स्नॅपडीलमधून काढून टाकण्यात आलेल्या कंपन्यांना पेटीएम आणि मोबीक्विकने नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.  स्टार्टअपमध्ये परदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असते. जसा काळ जात आहे तसे या कंपन्या आपल्या गुंतवणुकीतील हिस्सा कमी करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी कपात होत असल्याचे दिसत आहे. स्नॅपडीलचेच उदाहरण घ्यायचे तर स्नॅपडीलने ६०० कर्मचारी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पगार न घेता काम करण्याचा निर्णय घेतला आहे. स्नॅपडीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित बंसल यांनी पगार न घेता काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबरोबरच हॉटेल व्यवसायात असणारे स्टार्टअप स्टेझिल्ला बंद करण्यात येणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली असून या स्पर्धेत टिकणे अशक्य झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.  बाकीचे स्टार्टअप एका बाजूला बंद होत आहेत किंवा नोकर कपात करत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला मोबीक्विक, पेटीएएम, फ्रीचार्ज आणि वल्कन लॉजिस्टिक हे स्टार्टअप प्रगती करत आहेत. या कंपन्यामधून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या नव्या स्टार्टअपमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे.  नोटाबंदीनंतर पेटीएम आणि मोबिक्विक या कंपन्यांच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे. नोटाबंदीनंतर आता पुन्हा बाजारात रोकड आलेली आहे. त्यानंतर या अॅपचा वापर कमी होईल असे म्हटले जात होते, परंतु सध्या या कंपन्यांचा विस्तार पाहता परिस्थिती उलट आहे असे दिसते.