गुजरातेत आता मासेमारी ही अधिक पर्यावरणस्नेही होणार असून व्यावसायिकदृष्टय़ाही परवडण्याजोगी बनणार आहे याचे कारण तेथे आता मासेमारीसाठी वापरले जाणारे ट्रॉलर्स सौरशक्तीवर चालत आहेत. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्य़ातील मंग्रोळ तालुक्याचे रहिवासी असलेले असगर सैयद यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून आपण सौर बोट वापरण्यास सुरुवात केली आहे व ती व्यवस्थित काम देत आहे.
सैय्यद हे दोन खासगी कंपन्यांनी तयार केलेल्या एका सौरबोटीचे मालक आहेत. हा ट्रॉलर गेल्या महिन्यात बाजारात आला आहे. सौरबोटीमुळे त्यांचे मासेमारीचे काम कमी खर्चात होते. आपल्या जुन्या बोटीला पेट्रोल, डिझेल व केरोसिनसाठी मोठा खर्च येत होता. आता सौरबोटीने इंधनाचा खर्च वाचला आहे, असे सय्यद यांनी सांगितले. सध्या या सौरबोटीची किंमत जास्त असली तरी ती नजीकच्या काळात कमी होईल.
अखिल गुजरात मच्छिमार महामंडळाचे उपाध्यक्ष वेलजी मसानी यांनी सांगितले की, सौरबोट ही महागडी आहे पण पर्यावरणासाठी ते चांगले आहे. साधारण इंधनावर चालणाऱ्या बोटीची किंमत तीन लाख रुपये असते, तर सौरबोटीची किंमत साडेआठ लाख आहे. या बोटीची नुसती मोटारच तीन लाखांची आहे. बोटीची बॅटरी जड असून खवळलेल्या सागरात सौरबोट जास्त वेग घेत नाही.
अहमदाबादच्या देवार्च टेक्नॉलॉजीज प्रा. लि व कोची येथील नवगथी मरीन डिझाइन अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपन्यांनी ही बोट तयार केली आहे. तिची कामकाज पद्धत सांगताना नवागधी मरीन डिझाइनचे संदीथ थंडाशेरी यांनी सांगितले की, या बोटीच्या छपरावर सौरपट्टय़ा आहेत. त्या सूर्यप्रकाशाचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात व मच्छिमारांना छपराने सावलीही मिळते. ही विद्युत ऊर्जा बॅटरीत साठवली जाते व त्यामुळे हवी तेव्हा बोटीला वीज मिळते. यातील भार नियंत्रक म्हणजे चार्ज कंट्रोलर हे मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंगमध्ये बसवलेले असून त्यामुळे सूर्यप्रकाश कमी असेल तरी ऊर्जेची निर्मिती केली जाते. यात इंधन मोठय़ा प्रमाणात वाचते. येत्या चार वर्षांत या बोटीची किंमत खूप कमी होईल व गरीब मच्छिमारांनाही ती परवडेल. सौर मच्छिमार बोटीच्या रचनेविषयी देवार्च टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे के.के.जडेजा यांनी सांगितले की, पारंपरिक मच्छिमार बोटीसारखीच या बोटीची रचना असून ती आकाराने जरा लहान आहे.

सौरबोट
सौरऊर्जेचे विद्युत रूपांतर करण्यासाठी सोलर पॅनल्स.
बॅटरीत वीज साठवून तिचा पुरवठा.
सौरबोटीची किंमत साडेआठ लाख.
पारंपरिक बोटीची किंमत ३ लाख.
पर्यावरणाचे रक्षण व इंधनाचा खर्च वाचल्याने किंमत वसूल.

या बोटीच्या छपरावर सौरपट्टय़ा आहेत. त्या सूर्यप्रकाशाचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात व मच्छिमारांना छपराने सावलीही मिळते. ही विद्युत ऊर्जा बॅटरीत साठवली जाते व त्यामुळे हवी तेव्हा बोटीला वीज मिळते.