नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण लवकरच मायदेशी परतणार आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी चव्हाण यांच्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ‘चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवतरच चंदू चव्हाण भारतात परततील,’ असे भामरे यांनी म्हटले आहे.

मूळचे धुळ्याचे असणारे २२ वर्षांचे चंदू चव्हाण ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. ३० सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये आहेत. ‘चंदू चव्हाण यांच्याविषयी दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाली. चंदू चव्हाण सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली. चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल, असेदेखील पाकिस्तानच्या डिजीएमओंनी सांगितले,’ अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.

‘चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी डिजीएमओ स्तरावर बातचीत सुरू आहे. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारताच्या डिजीएमओंनी १५ ते २० वेळा पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत संवाद साधला आहे. त्यांनी चंदू चव्हाण सुरक्षित असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल, असे म्हटले आहे,’ अशी माहिती सुभाष भामरे यांनी दिली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये एकमेकांच्या हद्दीत नजरचुकीने गेलेल्या जवानांच्या हस्तांतरणासाठी करार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत अशा हस्तांतरणास वेळ लागेल, असे सुभाष भामरे यांनी बुधवारी म्हटले होते. ‘आम्ही त्या करारानुसार पाकिस्तान सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सध्या दोन्ही देशांचे संबंध फारसे चांगले नाहीत. सर्जिकल स्ट्राइकनंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. मात्र चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे भामरे यांनी म्हटले आहे.