पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार काश्मीरमध्ये गोळीबार केला आहे. बारामुल्ला परिसरात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

रात्री ९ च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात झाली. जवळपास एक तास पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. गुरुवारपासून पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जातो आहे. गुरुवारी रात्रभर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे.

पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला आहे. शिवाय रहिवाशी भागांनाही पाकिस्तानकडून लक्ष्य केले जात आहे. यासाठी १२० मीमी मोर्टारचा वापर करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून वारंवार केल्या जाणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या या उचापतींना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय सैन्याने उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. २९ सप्टेंबरला भारतीय सैन्याने ही कारवाई केली. यानंतर आतापर्यंत पाकिस्तानने ५६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.