अरुणाचलच्या राज्यपालांचे आश्वासन
राज्यातील काही प्रकरणे तपासासाठी सीबीआय किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्याकडे पाठवण्याची आपण लवकरच शिफारस करणार आहोत, असे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांनी म्हटले आहे.
विवक्षित प्रकरणे एनआयए किंवा सीबीआयकडे पाठवण्याचे लवकरात लवकर निर्देश दिले जातील, असे राज्यपालांनी राजभवनवर येऊन भेटलेल्या जनआंदोलन समिती व पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल यांच्या प्रतिनिधींना सांगितले.
राज्यात प्रशासनाची गाडी रुळावरून घसरवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई सुरू केली जाईल, असे राज्यपालांनी म्हटल्याचे राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात राज्यपालांनी सांगितले की, ही केवळ आणीबाणीकालीन उपाययोजना असून ती तात्पुरती व्यवस्था आहे. आज ना उद्या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून येणारे सरकार स्थाान होणार आहे, मात्र तोपर्यंत कुठल्याही किमतीवर राज्यातील कायदा- सुव्यवस्था स्थिती प्रभावीपणे राखावी लागेल. तसेच राज्यात प्रशासनावर विपरीत परिणाम करणाऱ्या भ्रष्टाचाराशी लढा देऊन सुशासन स्थापित करण्याची आम्हाला निश्चिती करावी लागेल, असेही राज्यपालांनी म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्था राखतानाच, लोकांशी मानवीय दृष्टिकोनातून वागण्याच्या सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.