प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

एका महिलेनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसंच लग्नाआधी पतीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा खटलाही दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. २०१६ मध्ये कनिष्ठ न्यायालयानं तिच्या पतीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका केली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला संबंधित महिलेनं उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. पतीवर बलात्कार प्रकरणी खटला चालवण्यात यावा, अशी मागणी याचिकेत केली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रेमसंबंध जुळल्यानंतर दोघांमध्ये परस्पर संमतीनं शरीरसंबंध ठेवले जातात. पण दोघांमधील वादानंतर काही महिला आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत न्यायालयानं नोंदवलं. तसंच न्यायालयानं महिलेची याचिका फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.