कोलकाता उच्च न्यायालयाने मोहरमच्या दिवशी दुर्गा मुर्तींचे विसर्जन करण्याचा दिलेला निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पसंत पडला नसल्याचे दिसते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कोणी माझा गळा कापू शकतो, पण मी काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही. शांतता राखण्यासाठी जे काही करता येईल, ते मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जींनी कोलकाता उच्च न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या निर्णयानंतर ही प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने ममता सरकारचे मोहरमच्या दिवशी दुर्गा मुर्तींचे विसर्जन न करण्याचा आदेश रद्द केला होता.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, दुर्गा मुर्तींचे विसर्जन रात्री १२ पर्यंत केले जाऊ शकते. यामध्ये मोहरमच्या दिवसाचाही समावेश आहे. सरकारकडे अधिकार आहेत. पण ते अमर्यादित नाहीत. कोणत्याही आधाराविना या शक्तीचा वापर करणे चुकीचे आहे. अखेरच्या पर्यायाचा वापर सर्वात शेवटी केला पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले होते.

सरकार लोकांच्या श्रद्धेमध्ये दखल देऊ शकत नाही. कोणत्याही तथ्याशिवाय ताकदीचा वापर करणे साफ चुकीचे आहे. सरकारकडे अधिकार आहेत, पण ते अमर्याद नाहीत. कोणत्याही आधाराशिवाय ताकदीचा वापर करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.

त्याआधी बुधवारीही न्यायालयाने सरकारला कठोर शब्दांत सुनावले होते. राज्यात जातीय सलोखा आहे असा दावा सरकार करत आहे. मग तुम्ही दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा सवाल केला होता.