ऑगस्तावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात देशहिताशी समझोता करून या हेलिकॉप्टरच्या उत्पादकाला किती सवलती दिल्या याचे सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्यावर शुक्रवारी हल्ला चढवला. या मुद्दय़ावर भाजप व काँग्रेस यांनी संसदेत एकमेकांविरुद्ध हक्कभंग युद्धही छेडले आहे.
‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’ अशी वृत्ती न बाळगता काँग्रेसने या प्रकरणी लाज बाळगून आपण दोषी नसल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान देऊन व सोनिया गांधींना लक्ष्य करून अमित शहा यांनी त्यांना उद्देशून अनेक प्रश्न विचारले.
३६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारात लाच घेणाऱ्यांची नावे सोनिया गांधी यांनी जाहीर करावी या मागणीचा पुनरुच्चार केला.
सरकारने दोन महिन्यांत या व्यवहारातील सत्य हुडकून काढावे, असे आव्हान देऊन काँग्रेसने भाजपवर पलटवार केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होईस्तोवर सरकारने हे सत्य शोधावे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद पत्रकारांना म्हणाले. ऑगस्तावेस्टलँडची मुख्य कंपनी असलेल्या ‘फिनमेकॅनिका’ कंपनीला तत्कालीन यूपीए सरकारने काळ्या यादीत टाकले होते, असे विधान केल्याबद्दल े सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आझाद यांच्याविरुद्ध राज्यसभेत हक्कभंगाची नोटीस दिली.