संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा विरोध जाणीवपूर्वक सरकारी वाहिन्यांवरून दाखविला जात नसल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, ललित मोदींना मदत आणि व्यापमं घोटाळ्याच्या मुद्द्यावरून पहिल्या दिवसापासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विरोधकांनी गेल्या तीन दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून कॉंग्रेससह इतर पक्षांचे विरोधक घोषणाबाजी करीत आहेत. मात्र, याची दृश्ये लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्यांवरून दाखविली जात नसल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. जाणीवपूर्वक सरकार विरोधकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीसुद्धा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. व्यापमं घोटाळ्यावर केंद्र सरकार काय कारवाई करणार, हे तर दूर राहिले. मुळात या विषयावर मोदी यांचे म्हणणे काय आहे, हे सुद्धा आम्हाला समजलेले नाही. या विषयावर मोदींनी बोलले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी मोदी केवळ हवेतल्या गप्पा करीत असतात, असाही टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, विरोधकांनी गोंधळ घातल्याने गुरुवारी सलग तिसऱया दिवशी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही सकाळपासून दोन वेळा तहकूब करण्यात आले आहे.