काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अमेरिकेतील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी आपल्या पासपोर्टची प्रत न्यायालयात सादर करण्यास नकार दिला आहे. वैयक्तिक सुरक्षा आणि गोपनियतेचे कारण देऊन पासपोर्ट सादर करण्यास नकार देण्यात आला आहे.
१९८४ साली झालेल्या शीख दंगलीप्रकरणी मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी सोनिया गांधी यांच्यावर अमेरिकेतील न्यायालयात खटला सुरू आहे. सुनावणी दरम्यान सोनियांच्या वकिलाने त्यांचे पत्र दाखल केले. यात सोनियांनी पासपोर्टची प्रत देण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. याआधीही सप्टेंबरमध्ये दोनवेळा झालेल्या सुनावणीला सोनिया न्यायालयात गैरहजर होत्या.  
अमेरिकन न्यायालयाचे न्यायाधीश ब्रेन एम कोगान यांनी सोनिया गांधी यांच्या अमेरिकेत येण्या-जाण्याच्या तारखांसदर्भातील स्पष्टता होण्यासाठी ७ एप्रिलपर्यंत सोनियांना आपल्या पासपोर्टची प्रत जमा करण्यास सांगितले होते. परंतु, वैयक्तिक सुरक्षा आणि गोपनियतेचे कारण देऊन सोनियांनी पासपोर्ट सादर करण्यास नकार दिला आहे.
शीख दंगली प्रकरणी सोनिया गांधी यांनी कमल नाथ, सज्जन कुमार आणि जगदीश टायटलर यांसारख्या बड्या काँग्रेसनेत्यांचा बचाव केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.