एनडीए सरकारचा पराभव करून २००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पंतप्रधानपद स्वीकारण्यास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नकार दिला होता. आपण आपल्या ‘अंतर्मना’चा आवाज ऐकून पंतप्रधानपद नाकारत आहोत, असे सोनियांनी त्या वेळी सांगितले होते; परंतु सोनियांनी पंतप्रधानपद न स्वीकारण्यामागे राहुल यांची भीती होती. सोनिया पंतप्रधान झाल्यास आजी इंदिरा व वडील राजीव यांच्याप्रमाणेच त्यांचीही हत्या होईल, अशी भीती राहुल यांना वाटत असल्याने सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले, असा दावा माजी परराष्ट्रमंत्री व एके काळी गांधी घराण्याचे अगदी निकटवर्तीय असलेल्या नटवरसिंग यांनी केला आहे.
८३ वर्षांचे नटवरसिंग इंदिरा तसेच राजीव गांधी यांच्या काळात त्यांचे अगदी निकटवर्तीय मानले जात. यूपीए-१ मध्ये ते परराष्ट्रमंत्रीही होते. मात्र इराकला तेलाच्या बदल्यात अन्न पुरविण्याच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहारातून उठलेल्या वादळात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. नटवरसिंग यांचे ‘वन लाइफ इज नॉट इनफ : अ‍ॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त एका चित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नटवरसिंग यांनी हा दावा केला.
सोनियांनी पंतप्रधानपद नाकारण्याची ही घटना या पुस्तकात प्रकाशित करू नये, अशी गळ घालण्यासाठी सोनिया गांधी आपली कन्या प्रियंका वडेरा हिच्यासह गेल्या ७ मे रोजी आपल्या निवासस्थानी आल्या होत्या. मात्र ‘सत्य’ मांडायचेच, असे आपण ठरवले होते, असे प्रतिपादन नटवरसिंग यांनी केले.
आपली आजी आणि वडील यांच्याप्रमाणेच आईचीही हत्या होईल, या भीतीने राहुल यांनी सोनियांना पंतप्रधान बनू देण्यास नकार दिला.