केंद्र सरकारने वारेमाप आश्वासने दिली, मात्र ती पाळली नाहीत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. तसेच जम्मू व काश्मीरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीच्या कामातही सरकारने राजकारण केल्याचे टीकास्त्र सोडले.
येथील प्रचारसभेस सोनियांनी भाजपला लक्ष्य केले. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात जनता सापडलेली असताना निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकारणावर बोलणे योग्य नाही. मात्र पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. २००५ मध्ये भूकंप झाला तेव्हा केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मदत केली. भाजपच्या राजवटीत आता परिस्थिती काय आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारने जी मदत मागितली तीही केंद्राने दिली नाही, अशी टीका सोनियांनी केली. आपल्या कुटुंबाचे मूळ काश्मीरमध्ये असल्याची भावनिक साद त्यांनी घातली.धर्माध शक्तींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतल्याचे स्पष्ट केले.