काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसाठी ६ मे रोजी रात्रीभोजनाचे आयोजन केले असून, यानिमित्ताने त्यांना व राहुल गांधी यांना भूसंपादन विधेयकाच्या मुद्दय़ासह देशातील राजकीय परिस्थितीवर खासदारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
५७ दिवस अज्ञातवासात राहून परत आलेले राहुल गांधी सध्या संसदेत व बाहेरही खंबीरपणे सक्रिय झालेले असतानाच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसने अद्याप संसदीय पक्षाची बैठक आयोजित केलेली नाही. त्यामुळे हे स्नेहभोजन म्हणजे दोन महिने राजकारणापासून दूर राहून परत आलेल्या राहुल गांधी यांच्याशी खासदारांचा व्यापक संवाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरणार आहे.
लोकसभेतील पक्षाचे खासदार ५ तारखेला पक्षाध्यक्षांची स्वतंत्र भेट घेणार आहेत. काँग्रेसचे लोकसभेत ४४, तर राज्यसभेत ६८ खासदार आहेत.