आंध्रप्रदेशात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात ३६ जणांचे बळी गेले आहेत. रेल्वेच्या वाढत्या अपघातांबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या रेल्वे अपघातांबाबत लवकरच रेल्वे मंत्रालय ठोस उपाय योजनांची अंमलबजावणी करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपली चिंता व्यक्त केली आहे. या प्रसिद्धिपत्रकामध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना सांत्वना दिली आहे. रेल्वेनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आपण रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून सर्व माहिती घेत असल्याचे त्यांनी म्हटले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येईल असे म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे पदाधिकारी आणि कर्माचारी घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. रेल्वे मंत्रालय या घटनेची संपूर्ण चौकशी करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्याची काळजी घेतली जाईल असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.

आंध्र प्रदेशमधील कुनेरूजवळ जगदलपूर – भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरल्याने ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. जगदलपूरवरुन भुवनेश्वरला निघालेल्या हिराखंड एक्सप्रेसला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आंध प्रद्रेशमधील कुनेरु स्थानकाजवळ अपघात झाला. या एक्सप्रेसचे सात डबे आणि इंजिन रुळावरुन घसरले. यात दोन सामान्य कोच, दोन स्लीपर कोच, दोन एसीचे डबे आणि लगेजच्या डब्याचा समावेश आहे. रात्री झोपेत असलेल्या प्रवाशांना नेमके काय झाले हे लक्षात आले नाही.

जोरदार आवाजाने आम्ही घाबरुन उठलो अशी माहिती एका प्रवाशाने दिली. अपघातात १०० प्रवासी जखमी झाले असावेत असे या भागातील उपजिल्हाधिका-यांनी म्हटले आहे. मात्र रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अमेक प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. अपघात ऐवढा भीषण होता की यात १२ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूदेखील घटनास्थळी भेट देतील अशी माहिती रेल्वेच्या अधिका-यांनी दिली आहे.