अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी राय बरेलीत भेट घेतली. त्याचप्रमाणे बचरावन येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ठार झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांचीही सोनिया गांधी यांनी भेट घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
शनिवारी सकाळी फुरसतगंज विमानतळावर उतरल्यानंतर सोनिया गांधी थेट पाचवार गावाकडे रवाना झाल्या आणि त्यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या वेळी आपल्या व्यथा सोनिया गांधी यांच्यासमोर मांडल्या. अद्याप कोणताही प्रशासकीय अधिकारी येथे पाहणी करण्यासाठी फिरकला नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर बंदिपूर आणि शिवपुरी गावांनाही सोनिया गांधी यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांनी त्यांना गहू आणि मोहरी पिकांचे किती नुकसान झाले त्याची माहिती दिली. या बाबी आपण संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि मदत मिळण्यासाठी सरकारवर दबाव टाकू, असे आश्वासन सोनिया गांधी यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिले.
त्यानंतर सोनिया गांधी यांनी रेल्वे अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची सवरेदयनगर आणि उतरपारा येथे जाऊन भेट घेतली.