‘संभ्रमित आणि भयभीत’ काँग्रेस पक्ष संसदेचे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात व्यत्यय आणत असल्याबद्दल भाजपने टीका केली असून हे अधिवेशन वाया गेले तर त्याचा दोष सोनिया गांधी यांना स्वत:वर घ्यावा लागेल, असे म्हटले आहे.
काँग्रेसची ज्या मुद्दय़ांबाबत तक्रार आहे, त्याबाबत चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र ज्या विरोधी पक्षाला प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जाही नाही, असा पक्ष देशाच्या नागरिकांची दिशाभूल करत आहे, असे भाजपच्या नेत्या निर्मला सीतारामन म्हणाल्या.
काँग्रेस आपली भूमिका बदलत असते. ते गोंधळलेले असून प्रत्येक विषयावर संसदेबाहेर चर्चा करू इच्छितात. काँग्रेसने निर्माण केलेला हा संभ्रम कायम असून, संसदेच्या फलदायी अधिवेशनाचा भारताच्या नागरिकांचा हक्क डावलला जात आहे, असे सीतारामन यांनी सर्वपक्षीय बैठकीच्या पाश्र्वभूमीवर सांगितले.