उत्तर प्रदेशातील दहावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान गणिताच्या पेपरच्या आधी मी कासगंज बाजारात मागील वर्षाचा राहिलेला मटार विकत होते, हे उद्गार आहेत बंटी या विद्यार्थ्याचे. बंटी आपल्या आई-वडिलांना शेतातील कामात मदत करतो.
रविवारी उत्तर प्रदेश बोर्डाच्या दहावी परीक्षेचे निकाल जाहीर झाले. एसएसपीडीएसवीएम इंटर कॉलेजचा विद्यार्थी बंटीने ९६.६ टक्के गूण मिळवून दुसरे स्थान प्राप्त केले. राज्यभरात ३४ लाख ९८ हजार ४२८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. तर सर्वेश शर्मा या अन्य एका शेतकऱ्याच्या मुलाने पहिले स्थान पटकाविले. सर्वेश हा जीएसएएस अकादमीचा विद्यार्थी आहे. बंटी आणि सर्वेशच्या मार्कांमध्ये केवळ एका मार्काचा फरक आहे. बंटीने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांना देत, घरात पैशाची टंचाई असून शिक्षकांनी कधीही आपल्या अभ्यासात पैशामुळे व्यत्यय येऊ न दिल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’शी फोनवरून संवाद साधताना सांगितले. अतिशय हुशार असलेल्या बंटीच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीविषयी समजल्यावर त्याची फी माफ केल्याचे शाळेचे व्यवस्थापक कौशल किशोर यांनी सांगितले.