लवकरच तुम्ही किराणा मालाच्या दुकानावरुन किंवा फेरीवाल्यांकडून वाय-फाय खरेदी करु शकणार आहात. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला फेरीवाला स्वस्तात वाय-फाय विकताना दिसू शकतो. या सेवेची सुरुवात मेरठपासून करण्यात येणार असल्याची माहिती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॅलिमॅटिक्सकडून (C-DoT) देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच मेरठमधील फेरीवाले वाय-फाय सेवा देताना दिसणार आहेत.

‘नव्या योजनेअंतर्गत छोटे दुकानदार आणि किराणा दुकानांमध्ये वाय-फाय देणारे मशीन ठेवण्यात येईल. वाय-फायचा वापर करण्यासाठी किराणा दुकान किंवा फेरीवाल्यांकडे जावे लागेल. यानंतर वाय-फाय वाऊचर खरेदी करुन लोक वाय-फाय इंटरनेटचा वापर करु शकतात. वाय-फाय वाऊचरची किंमत १० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल,’ असे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॅलिमॅटिक्स कार्यकारी संचालक विपीन त्यागी यांनी सांगितले.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॅलिमॅटिक्सने (C-DoT) मास मार्केट पब्लिक डेटा ऑफिस टेक उपकरणाची निर्मिती केली आहे. या अंतर्गत ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत वाय-फाय सेवा पुरवण्याची योजना आहे. ही उपकरणे दुकानदारांना पुरवण्यात येतील. या उपकरणाच्या मदतीने दुकानदार वाय-फाय विकू शकतील.

दुकानदार आणि फेरीवाल्यांना देण्यात येणाऱ्या उपकरणामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा समावेश असेल. या उपकरणात ई-केवायसीसोबत वाय-फाय ऍक्सेस पॉईंट लावले जातील. यासोबतच वाऊचरची नोंद आणि व्यवस्थापन करण्यासाठी ओटीपी असेल. या सर्व गोष्टींचा समावेश दुकानदार आणि फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या उपकरणात असेल.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॅलिमॅटिक्स (C-DoT) लवकरच हे तंत्रज्ञान २० भागीदार कंपन्यांना देणार आहे. यामध्ये एचएफसीएल आणि बीएचईएलचा समावेश आहे. नव्या उपकरणामुळे निमशहरी आणि ग्रामीण भागातील छोटे दुकानदार २.२४ गीगाहार्ट्झ आणि ५.८ गिगाहार्ट्झ फ्रिक्वन्सीचा वापर करुन वाय-फाय डेटा उपलब्ध करुन देऊ शकतात. यासाठी दुकानदार आणि फेरीवाल्यांना नियमन आणि नोंदणी प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही, असे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॅलिमॅटिक्सने म्हटले आहे.