दक्षिण कोरियात जलसमाधी मिळालेल्या प्रवासी जहाजातील मृतदेह शोधण्याचे काम अद्याप सुरूच असून बुधवारी या दुर्घटनेतील मृतांची संख्या १५० वर पोहोचली आहे. एक आठवडा उलटून गेलेल्या या दुर्घटनेतील शोधकार्य सुरू असले तरी प्रतिकूल हवामान आणि पाण्याखाली असलेला अंधार यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
या जहाज दुर्घटनेत सेऊल जवळच्या आनसन भागातील एकाच शाळेतील ३२३ विद्यार्थी मृत अथवा बेपत्ता झाले आहेत. पाणबुडय़ांनी आतापर्यंत १५० च्या वर मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ध्वनिक्षेपकावरून त्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे शोकाकुल नातेवाईक दुर्घटनास्थळाकडे धाव घेत आहेत.