पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतल्याने देशभरातून अभिनेता सलमान खानवर टीका होत असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी मात्र त्याची पाठराखण करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला खरचं देशाच्या सुरक्षिततेसंबंधी चिंता वाटत असेल तर त्यांनी असली शुल्लक नाटके न करता सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करायला हवी, असा सल्ला दिला आहे. सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी त्याच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार अबु आझमी यांनी घेतला.
सलमान खानने काही चुकीचे म्हटलंय असं मला वाटत नाही. त्याच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेला देशाच्या सुरक्षिततेसंबंधी इतकी काळजी वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करायला हवी. तेही सरकारचा एक भाग आहेत. सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा दिलेला आहे.
अजूनही भारत-पाकिस्तानमध्ये बस वाहतूक सुरू आहे. दोन्ही देशाच्या राजदूतांना परत बोलावलेले नाही. त्यामुळे मला शिवसेनेच्या नाटकीपणाबद्दल शंका वाटते असे ते म्हणाले. पाकिस्तानी कलाकार भारतात राहावे किंवा नाही हे सरकार आणि देशातील नागरिकांनी ठरवावे. ते आपले पाहुणे आहेत. पाहुण्यांशी अशी वागण्याची आपली संस्कृती नाही. आपण त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे. आपण त्यांचे स्वागत केल्यास ते पुन्हा आपल्या देशात गेल्यानंतर त्यांच्या देशवासियांना भारताच्या चांगुलपणाची माहिती देतील. त्यांनाही याबाबत खेद वाटेल, असे ते म्हणाले.
ते (पाकिस्तानी कलाकार) हे कलाकार आहेत दहशतवादी नाही. सरकारने त्यांना इथे काम करण्याची परवानगी आणि व्हिसा दिला आहे असे सलमान खानने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. यावर शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सलमानने आपल्या वडिलांकडून धडे घेण्याची गरज असल्याचे म्हटले होते.