गोरक्षकांचे हल्ले थांबले नाहीत तर आता मुस्लिम समाज प्रत्युत्तर करायला सुरूवात करेल आणि असं झालं तर देशात शांतता प्रस्थापित होऊ शकणार नाही असं वक्तव्य समाजवादीचे नेते अबू आझमी यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी यांनी आपली भूमिका मांडली आहे.

देशात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे त्या त्या राज्यांमध्ये गोरक्षणाच्या मुद्द्यावरून मुस्लिम बांधवांना मारहाण केली जाते आहे. एका माणसाला एकटं गाठून ४०-५० जणांचा जमाव बेदम मारहाण करतो आहे. अशी कृती करणं हा दहशतवादच आहे. गायीचं रक्षण करणाऱ्यासाठी एवढं झटणाऱ्या लोकांनी एकदा काश्मीरमधे पाऊल ठेवून सैन्यदलावर होणारे हल्ले थांबवून दाखवावेत असं आव्हानही अबू आझमी यांनी दिलं आहे.

जुनैदला ज्याप्रकारे गोमांस बाळगल्याचा संशयावरून  मारहाण झाली आणि ज्याप्रकारे त्याचा जीव गेला त्यानंतर आता मुस्लिम समाज ट्रेननं प्रवास करण्यासाठी घाबरतो आहे. प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते. आता जर मुस्लिम समाजानं प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली तर देशातलं वातावरण बिघडून जाईल. सध्याचं देशातलं वातावरण असं आहे की माणसाच्या आयुष्यापेक्षा गाय आणि बैल यांच्या आयुष्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुस्लिम समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका जर आम्ही हत्यार उचललं तर देशात अशांतता पसरेल. एक दोन दिवसापूर्वी एका गोरक्षकाला मुस्लिम समाजातल्या लोकांनी मारल्याची घटना माझ्या ऐकिवात आली आहे. जर गोरक्षकांचे हल्ले थांबले नाही तर अशा घटना जास्तीत जास्त प्रमाणात घडतील आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाईल, मग मुस्लिम समाजाला दोष देऊ नका असा इशाराही अबू आझमी यांनी दिला आहे. सोशल मीडियावर अबू आझमी यांची ही मुलाखत व्हायरल होते आहे. तसंच आझमी यांनी योग्य मुद्दे मांडले आहेत असंही मत अनेकांनी मांडलं आहे. मुस्लिम समाजाला आता मोबाईल सोबत बंदुकही जवळ बाळगायला हवी अशीही प्रतिक्रिया काही नेटिझन्सनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फक्त कथित गोरक्षकांच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पण याशिवाय त्यांनी कारवाई काय केली आहे? त्यांनी कारवाईचे आदेश देऊनही हे हल्ले थांबलेले नाहीत. देशासाठी हे चांगलं नाही असंही अबू आझमी यांनी स्पष्ट केलं आहे.